
लातूर, 28 फेब्रुवारी, (हिं.स) लातूर शहरातील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात तसेच खंडापूर परिसरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास जिल्ह्यासह इतर भागांतून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहत आहेत. सातत्याने सुरू असलेले कीर्तन, भजन, प्रवचन व धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. अशा मोठ्या धार्मिक सोहळ्यांदरम्यान नागरिकांची सुरक्षितता, गर्दीचे नियोजन व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी पूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सप्ताह स्थळी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सतर्क पोलीस बंदोबस्त ठेवणे, वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवणे तसेच पोलीस मदत कक्ष प्रभावीपणे कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश दिले होते. विशेषतः दूरवरून येणाऱ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, हरवलेली मुले किंवा व्यक्ती तात्काळ शोधून काढता याव्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत लगेच उपलब्ध व्हावी यासाठी पोलीस मदत चौकी सक्रिय ठेवण्यात आली होती.
पोलीस अधीक्षकांच्या पाहणीदरम्यान एक छोटा मुलगा भांबावलेल्या अवस्थेत पोलीस मदत चौकीमध्ये असलेला पोलीस अधीक्षकांच्या नजरेस पडला. पोलीस अधीक्षकांनी तत्काळ त्या मुलाला आपल्या कडेवर घेऊन आपुलकीने त्याची विचारपूस केली. मुलगा हरवलेला असल्याचे लक्षात येताच त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्वरित त्याच्या पालकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी तातडीने परिसरात शोधमोहीम राबवून काही वेळातच त्या मुलाच्या पालकांचा शोध लावला व त्या चिमुकल्याला सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात दिले.
याच दरम्यान दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.00 वा. कार्यक्रमादरम्यान यशराज नितीन कारभारी (वय 06 वर्षे) हा मुलगा गर्दीत आपल्या कुटुंबापासून वेगळा झाला. घाबरलेल्या अवस्थेत फिरत असताना एका जागरूक नागरिकाने त्याला पाहून तात्काळ कार्यक्रमस्थळी असलेल्या पोलीस मदत कक्षात आणून दिले.
पोलीस मदत कक्षावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत संयमाने त्या मुलाशी संवाद साधून त्याला विश्वासात घेतले व त्याच्याकडून नाव, गाव व कुटुंबीयांची माहिती जाणून घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचे वडील नितीन माणिक कारभारी (रा. काळा लिंबाळा, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांच्याशी संपर्क साधण्यात आला. पडताळणी करून मुलाला सुरक्षितपणे त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. मुलगा सुखरूप परत मिळाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच या सप्ताहादरम्यान अर्णव बालाजी चव्हाण (वय 04 वर्षे, रा. चिकुर्डा, ता. जि. लातूर) हा चिमुकलाही गर्दीत हरवला होता.
बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे शोधून काढले व त्याची आई प्रियंका बालाजी चव्हाण यांच्या ताब्यात दिले. तसेच पारूबाई वेंकट धावडे (वय 75 वर्षे, रा. कोंडवा, पुणे) या वृद्ध महिला सायंकाळी सुमारे 16.10 वा. हरवल्याची माहिती त्यांच्या सून कल्पना धावडे यांनी पोलीस मदत कक्षात दिली. माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात शोध घेऊन त्या महिलेला शोधून काढले व सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
सदरची संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशांवर पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक श्री. समाधान चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तावर कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत तत्परतेने पार पाडली.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे हरवलेले नागरिक अल्पावधीतच त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मिळाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मोठ्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहताना आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे तसेच काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ जवळील पोलीस मदत कक्षाशी संपर्क साधावा.
पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा शांततेत व सुरळीत पार पडत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis