नांदेड - विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी निळा गावातील पालकांचे मोबाइल दोन तास ठेवणार बंद
नांदेड, 28 फेब्रुवारी, (हिं.स.) - नांदेड तालुक्यातील निळा गावातील ग्रामस्थांनी वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. वाढत्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकून राहावेत, य
नांदेड - विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी निळा गावातील पालकांचे मोबाइल दोन तास ठेवणार बंद


नांदेड, 28 फेब्रुवारी, (हिं.स.) - नांदेड तालुक्यातील निळा गावातील ग्रामस्थांनी वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. वाढत्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकून राहावेत, यासाठी निळा येथील जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी संघ, शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांनी एकत्र येत दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत गावातील सर्व पालकांचे मोबाईल बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण ठराव घेतला आहे.

या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी एक अनोखी नियमावली तयार करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता गावातील हनुमान मंदिरावरून सायरन वाजवला जाईल. सायरनचा आवाज होताच गावातील सर्व पालक आणि विद्यार्थी आपले मोबाईल फोन बंद करतील किंवा सायलेंट मोडवर ठेवतील. या दोन तासांच्या कालावधीत पालकांनी स्वतःच्या पाल्यांकडून अभ्यास करून घ्यावा आणि त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करावे, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. मोबाइलच्या विद्यार्थ्यांच्या अतिवापरामुळे अभ्यासावर होणारा परिणाम टाळण्यासाठी हा जाणीवपूर्वक बदल करण्यात आला आहे. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून २७फेब्रुवारीपासून या उपक्रमाची गावात प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे.

एचएआरसी संस्थेच्या वतीने निळा जि.प. शाळेस आनंदी वाचन पेटी भेट देण्यात आली. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत शाळेला १०१ पुस्तकांचा संच सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, प्रकाश डुबे, भरतकुमार ठाकर, प्रा. डॉ. शिवा आयथळ, मुजांजी जोगदंड, रविकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande