
मुंबई, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। राज्यातील विविध मैदानांवर शौचालय व चेंजिंग रूमच्या अभावामुळे गैरसोय होत आहे. या प्रकरणी लोकायुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर, चित्रा वाघ, ॲड.अनिल परब, प्रविण दरेकर यांनी राज्यातील क्रीडा मैदानावर महिला खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे नसल्याची बाब एका प्रश्नाद्वारे मांडली, त्यास राज्यमंत्री मिसाळ यांनी उत्तर दिले.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, 8 जानेवारी 2025 रोजी या विशेष चौकशी पथकाची अधिकृत स्थापना करण्यात आली असून राज्यातील सर्व मैदाने व क्रीडा संकुलांचे गुगल मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. संबंधित मैदानांवरील विद्यमान सुविधा, आवश्यक सोयीसुविधा, तसेच त्यासाठी लागणाऱ्या निधीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यमंत्री म्हणाल्या की, नियमानुसार 2000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या मैदानांवर स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. मात्र, ओव्हल मैदान संदर्भातील सुप्रीम कोर्ट प्रकरणाचा आधार घेत काही ठिकाणी मैदानांवर कायमस्वरूपी बांधकाम करता येत नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र एका मैदानासंदर्भातील निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा मुंबईतील सर्व मैदानांना लागू होतो का, याबाबत एसआयटीला विधी विभागाकडून स्पष्ट मत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कायमस्वरूपी बांधकाम शक्य नसल्यास कंटेनरच्या माध्यमातून तात्पुरती शौचालये व चेंजिंग रूम उभारण्याचा पर्यायही विचारात घ्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर