समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेसाठी एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन प्रणाली - बोर्डीकर
मुंबई, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने देशातील पहिली एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम समृद्धी महामार्गावर बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रणाली
समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेसाठी एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन प्रणाली - बोर्डीकर


मुंबई, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने देशातील पहिली एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम समृद्धी महामार्गावर बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन भविष्यात अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होईल, अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली.

विधानपरिषद सदस्य सुधाकर अडबोले, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. याप्रश्नासंदर्भात माहिती राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी मानांकनानुसार सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. या महामार्गावर क्रॅश बॅरियर्स, रबर स्ट्रिप्स, साईनबोर्ड आदी सुविधा बसविण्यात आल्या असल्याची माहिती राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

महामार्गावर नियमित पोलीस पेट्रोलिंग तसेच ॲम्बुलन्स पेट्रोलिंग सुरू असून आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय 21 क्यूआरव्ही (क्विक रिस्पॉन्स व्हेईकल) पथके कार्यान्वित असल्याचेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, भिवंडी–ठाणे मार्गाचे काम सुरू असून ठाणे–मुंबईदरम्यान एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येणारा रिंग रोड आणि उन्नत मार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. प्रवास गतिमान करण्यासाठी विविध जोडरस्त्यांचे नियोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

छेडानगर ते आनंदनगर तसेच ठाणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते विकसित करण्यासाठी बीओटी तत्वावर किंवा इतर माध्यमांतून निधी उभारण्याचे पर्याय तपासले जात आहेत. आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईल, अशीही माहिती राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande