
अमरावती, 01 मार्च (हिं.स.)
“उन्हाळा डोक्यावर आला तरी पाणीटंचाईची कामे अर्धवटच आहेत. कंत्राटदारांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत, निधी अडकला आहे आणि जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करा,” असा थेट इशारा आमदार प्रतापदादा अडसड यांनी विधानसभेत दिला.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रश्नोत्तराच्या तासात आक्रमक भूमिका घेत अडसड यांनी अमरावती जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या गंभीर समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. गतवर्षी जिल्ह्यासाठी पाणीटंचाई निवारणासाठी १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता; मात्र त्यापैकी केवळ साडेतीन कोटी रुपये उपलब्ध झाले, उर्वरित साडेनऊ कोटी रुपये अद्यापही मिळाले नसल्याने अनेक योजना अर्धवट राहिल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.जल जीवन मिशनअंतर्गत १२ कोटींची देयके थकीत असल्याने पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाऊ शकलेल्या नाहीत. अनेक गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम रखडले आहे, पाईपलाईन घरापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. कंत्राटदारांना देयके न मिळाल्याने कामे बंद पडली आहेत. “जनतेला पाणी नाही, आणि शासन फक्त कागदोपत्री योजना दाखवत आहे,” असा घणाघात त्यांनी केला.धामणगाव मतदारसंघात हातपंप दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे केवळ एकच गाडी उपलब्ध असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. उन्हाळ्यात टंचाई तीव्र होत असताना दुसरी गाडी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच यांत्रिकी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे करार संपल्याने हातपंप दुरुस्ती ठप्प झाली आहे. संबंधित कंत्राट वाढवून द्यावे किंवा नव्या निविदा त्वरित काढाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाऐवजी प्रशासक नेमल्याने पाणीपुरवठा व स्वच्छता निधी खर्च होत नसल्याची बाबही त्यांनी मांडली. साडेपाचशे ग्रामपंचायतींमध्ये निधी न वापरता परत मागविण्यात आला आहे. “प्रशासकांना निधी खर्च करण्याचे स्पष्ट निर्देश द्या, अन्यथा गावागावात पाणीटंचाईचा स्फोट होईल,” असा इशाराही अडसड यांनी दिला.अडसड यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. सरकारने या मुद्द्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी