सेट प्रमाणपत्रावर फेरफार करून मिळवली नोकरी; अमरावती विद्यापीठात बोगस पीएचडी?
अमरावती, 01 मार्च (हिं.स.) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून सेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्या प्रमाणपत्रावर फेरफार करून दोन प्राध्यापकांनी तासिका तत्वावर (सीएचबी) नोकरी मिळविली, याबाबतची तक्रार राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे काही दिवसां
सेट प्रमाणपत्रावर खोडतोड करून मिळवली नोकरी; अमरावती विद्यापीठात बोगस पीएचडी?


अमरावती, 01 मार्च (हिं.स.)

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून सेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्या प्रमाणपत्रावर फेरफार करून दोन प्राध्यापकांनी तासिका तत्वावर (सीएचबी) नोकरी मिळविली, याबाबतची तक्रार राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. याप्रकरणी राज्यपाल कार्यालयातून 'लेटर बॉम्ब' विद्यापीठात धडकले असून आता नेट-सेट संघटनेचे पदाधिकारी आणि 'फ्रॉड' करून नोकरी मिळविणाऱ्या प्राध्यापकाचा शोध घेतला जात आहे.

राज्यपाल कार्यालयातून विद्यापीठाकडे आलेल्या कागदपत्रानुसार येथील शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. चेतक शेंडे यांच्या पीएचडी पदवीवर बोट ठेवण्यात आले आहे. तसेच श्रृती प्रकाश बडेरे यांनी नेट-सेट प्रमाणपत्रात खाडाखोड करून सीएचबी प्राध्यापकांची नोकरी मिळवली आहे. राज्यपालांकडे तक्रार करणाऱ्यांनी केवळ नेट-सेट संघटना या नावाचा उल्लेख केला असून तक्रारदारांनी नाव टाळले आहे. किंबहुना राज्यपाल कार्यालयाने अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना मेलवजा तक्रारीची प्रत मार्किंग करून अहवाल सादर करण्याचे कळविले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून विद्यापीठाच्या महाविद्यालयीन विभागाने या तक्रारीच्या अनुषंगाने 'त्या' तासिका तत्त्वावरील प्राध्यापकाचा शोध चालविला असून माहिती गोळा केली जात आहे. याप्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

१५ वर्षांनंतर प्रकरण उघडकीस; रॅकेट असल्याचा संशय

अमरावतीचे दोन सीएचबी प्राध्यापकांनी सेटचे प्रमाणपत्रात खाडाखोड करून नोकरी मिळवली. प्रमोशनही झाले. १५ वर्ष झाल्यावर आता घटना उघड झाली. तक्रार निनावी असली तरी गंभीर स्वरूपाची आहे. बोगस पीएचडी आणि नेट प्रमाणपत्रात खाडाखोड करून नोकरी मिळवण्याचे रॅकेट असावे असा संशय बळावला जात आहे.

एफआयआर आणि सेवेतून बडतर्फ

कारंजा नजीकच्या कामरगाव येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापक सुरेंद्र चव्हाण यांचे नेट प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार राजभवनाकडे झाली होती. त्यानंतर चौकशी झाली असता सन २०२३ मध्ये सुरेंद्र चव्हाण यांच्यावर एफआयआर दाखल होऊन सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.

सेट प्रमाणपत्रात खोडतोड आणि पीएचडी पदवी फ्रॉड हे प्रकरण तूर्त माझ्याकडे आलेले नाही. राज्यपाल कार्यालयातून आलेल्या तक्रारीची प्रशासनाने शहानिशा करणे सुरू केली असेल. सरतेशेवटी निर्णयार्थ येईल, त्यानंतर वस्तुनिष्ठ अहवाल राजभवनात पाठविला जाईल.

- डॉ. मिलिंद बारहाते, कुलगुरू अमरावती विद्यापीठ.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande