
ठाणे, 01 मार्च (हिं.स.)। : राज्याच्या मोटार परिवहन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या कार्याचा गौरव करताना “ हा केवळ एका विभागाचा वर्धापन दिन नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि लोकसेवेच्या अखंड परंपरेचा उत्सव आहे,” असे प्रतिपादन केले.
वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर, अधिकारी वर्ग, कर्मचारी बांधव-भगिनी आणि नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, परिवहन विभाग हा राज्याच्या अर्थकारणाचा आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. *रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणे नव्हे तर ' अपघात मुक्त प्रवास ' हेच भविष्यात परिवहन विभागाचे उद्दिष्ट असले पाहिजे!* ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच उद्योग-व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी हा विभाग थेट जोडलेला आहे. दुर्गम आदिवासी पाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची अभिमानास्पद परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यात आल्याचे सांगताना त्यांनी ऑनलाइन परवाना प्रक्रिया, डिजिटल सेवा, रस्ता सुरक्षा उपक्रम आणि अवैध वाहतुकी विरुद्धची कठोर कारवाई यांचा विशेष उल्लेख केला. “आपल्या कर्मचाऱ्यांचे कष्ट, समर्पण आणि शिस्तबद्ध कामगिरी हीच विभागाची खरी ताकद आहे,” असे ते म्हणाले.उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असो—परिवहन विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात, याचा अभिमान असल्याचे मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. आगामी काळात *सुरक्षित, हरित आणि स्मार्ट परिवहन* सेवा उभारणी हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ता सुरक्षा जनजागृती, पर्यावरणपूरक वाहने, पारदर्शक प्रशासन आणि जनसहभाग यावर अधिक भर देऊन राज्याच्या विकासाला नवे वेग देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या सह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुटुंबियांसह उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर