
नवी दिल्ली , 01 मार्च (हिं.स.)।हिंदी चित्रपट ‘जन्नत’ फेम अभिनेत्री सोनल चौहान सध्या मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये अडकली आहे. युद्धामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली असून भारतात परतण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याची माहिती सोनलने दिली आहे. अशा परिस्थितीत सोनलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे.
सोनल चौहान यांनी आपल्या एक्स खात्यावर लिहिले, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, युद्धामुळे मी दुबईमध्ये अडकले आहे. फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत आणि भारतात परतण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शनाची विनंती करते. कोणतीही मदत मिळाल्यास मी आभारी राहीन.”
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्रालय यांनी या प्रकरणात सांगितले की मध्यपूर्वेतील त्यांच्या सर्व मिशन्स भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहेत. आवश्यक सूचना (अॅडव्हायझरी) जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोनल चौहानने इमरान हाश्मीसोबत जन्नत (२००८) या चित्रपटातून पदार्पण केले. ती शेवटची २०२४ मध्ये आलेल्या दर्द या बंगाली चित्रपटात दिसली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode