
बीड, 01 मार्च (हिं.स.)।
अंबाजोगाई शहराला 'पुस्तकांचे गाव' म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी होण्यासाठी प्रशासनाने शहरवासीय आणि संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या उद्योग व मराठी भाषा मंत्र्यांनी अंबाजोगाई शहराला 'पुस्तकांचे गाव' म्हणून घोषित केल्यानंतर बीड जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी अपर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
राज्य मराठी विकास संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, या प्रकल्पाचा सर्वंकष शासन निर्णय अद्याप प्रलंबित असला तरी, तत्पूर्वी शहरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था व नागरिकांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या अंबाजोगाईतील संस्था आणि नागरिकांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव १० मार्च २०२६ पर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबाजोगाई येथे सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, अर्जाचे नमुने उपविभागीय कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis