
लातूर, 01 मार्च (हिं.स.)।
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक १ मार्च २०२६ रोजी उपविभागीय कार्यालय अहमदपूर येथे 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने'ची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील शेत रस्त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अहमदपूर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींमध्ये १२४ ग्रामसभा घेऊन एकूण ५२८ रस्ते निश्चित करण्यात आले आहेत, तर चाकूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींमध्ये ८६ ग्रामसभा होऊन ३७६ रस्ते निश्चित करण्यात आले असून या गावनिहाय आराखड्यानुसार समितीने मंजुरी प्रदान केली आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सूचना दिल्या की, अहमदपूरमधील ६४० आणि चाकूरमधील ६२९ मॅपिंग केलेल्या रस्त्यांपैकी ज्या रस्त्यांची शेतकऱ्यांना खरी आवश्यकता आहे, ती कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. तसेच मार्च महिन्यापर्यंत सर्व तांत्रिक व प्रशासकीय मान्यता पूर्ण करून प्रस्ताव सादर करावेत आणि तहसील कार्यालयात प्राप्त झालेल्या रस्त्यांबाबतच्या तक्रारींची तात्काळ विल्हेवाट लावावी, असे निर्देशही त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी रस्त्यांची सुविधा महत्त्वाची असून, शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी 'जनताभिमुख' काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बैठकीच्या शेवटी अहमदपूरचे प्र. तहसीलदार अभिलाष जगताप यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis