सोलापूर - चंद्रभागा दूषितच; शुद्धीकरण यंत्रणा कुचकामी
सोलापूर, 01 मार्च (हिं.स.)चंद्रभागा नदीपात्रात जलशुद्धीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली सेबर SABRE (Stabilised aerobic bio-engineered reatrion environment) टेक्नॉलॉजी कुचकामी ठरली आहे. ही यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्याने शा
सोलापूर - चंद्रभागा दूषितच; शुद्धीकरण यंत्रणा कुचकामी


सोलापूर, 01 मार्च (हिं.स.)चंद्रभागा नदीपात्रात जलशुद्धीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली सेबर SABRE (Stabilised aerobic bio-engineered reatrion environment) टेक्नॉलॉजी कुचकामी ठरली आहे. ही यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्याने शासनाचे पैसे पाण्यात गेले आहेत. परिणामी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आलेल्या भाविकांना चंद्रभागेच्या दूषित पाण्यातच नाईलाजास्तव स्नान करावे लागत आहे.

जेथे भाविक स्नानासाठी चंद्रभागा वाळवंटात पुंडलिक मंदिरालगत उतरतात, तेथे शुद्ध, स्वच्छ पाणी असणे अपेक्षित आहे. मात्र, शुद्धीकरण यंत्रणाच निष्प्रभ ठरल्याने त्या ठिकाणी प्रदूषणाची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चंद्रभागा स्नान करताना गढूळ पाणी, शेवाळमिश्रित दूषित पाण्यात स्नान करावे लागत आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यात किडे, अळ्यादेखील दिसत असल्याने बहुतांश भाविक हे इच्छा असूनही स्नान करण्याचे टाळत आहेत.भीमा नदीत कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे तसेच नदी मार्गावरील अन्य औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी, रासायनिक पाणी थेट मिसळत आहे. हेच पाणी पुढे पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत येते. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे. हे पाणी भाविकांना स्नानासाठी योग्य नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande