कमर्शियल गॅस सिलेंडर ३१ रुपयांनी महागला
नवी दिल्ली, 01 मार्च (हिं.स.)। देशातील तेल विपणन कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या दरात बदल जाहीर करत १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत २८ ते ३१ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी आज १ मार्चपासून करण्यात आली
Commercial gas cylinder


नवी दिल्ली, 01 मार्च (हिं.स.)। देशातील तेल विपणन कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या दरात बदल जाहीर करत १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत २८ ते ३१ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी आज १ मार्चपासून करण्यात आली आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे होळीच्या तोंडावर गृहिणींचे बजेट कोलमडण्यापासून काही प्रमाणात बचाव झाला आहे.

राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर ८५३ रुपयांवर स्थिर ठेवण्यात आला असून मुंबईत तो ८५२.५० रुपये इतकाच राहणार आहे. पाईप्ड नॅचरल गॅसच्या दरातही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी व्यावसायिक ग्राहकांवर मात्र अतिरिक्त आर्थिक ताण पडणार आहे.

कमर्शियल गॅस सिलेंडरच्या वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व्यवसाय तसेच ढाबा चालकांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांची संख्या वाढत असताना इंधन खर्च वाढल्याने व्यवसायिकांना दरवाढीचा फटका बसणार आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींसोबतच गॅसच्या दरवाढीमुळे बाहेरच्या जेवणाचे दरही वाढू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रमुख शहरांमध्ये कमर्शियल सिलेंडरचे नवे दर लागू झाले असून दिल्लीत १,७४०.५० रुपयांवरून दर १,७६८.५० रुपये झाला आहे, म्हणजेच २८ रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत १,६९२ रुपयांवरून तो १,७२०.५० रुपयांवर गेला असून २८.५० रुपयांची वाढ झाली आहे. कोलकात्यात १,८४४.५० रुपयांवरून १,८७५.५० रुपये असा ३१ रुपयांचा वाढीव दर लागू झाला आहे. चेन्नईत १,८९९.५० रुपयांवरून १,९२९ रुपये असा २९.५० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या या दरवाढीमुळे व्यावसायिक क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दर आणि कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असे संकेत मिळत आहेत. दरम्यान, घरगुती गॅसचे दर कायम ठेवल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande