
रायगड, 01 मार्च (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६:३५ वाजण्याच्या सुमारास मौजे सायमाळ गावच्या हद्दीत मॅजिक पॉईंट येथे एक्सप्रेस हायवेच्या पुलाखाली भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालकाने आपल्या ताब्यातील पिकअप वाहन लोणावळा बाजूकडून खोपोलीकडे नेत असताना अतिवेगाने, हयगयीने व अविचाराने वाहन चालवले. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असताना त्याने फिर्यादी यांच्या मोटारसायकल (क्र. एमएच-४६-बीपी-६६८५) ला जोरदार धडक दिली.
या अपघातात फिर्यादी, रा. अस्सल धनगरवाडा, पो. चिंचेवली, ता. कर्जत यांना साधी दुखापत झाली. मात्र त्यांच्या चुलत भावाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर चालकाने अपघातस्थळी न थांबता पळ काढल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गु.र. नं. ६९/२०२६ अन्वये मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४, १३४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षकांकडून सुरू आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके