लेबर कॉलनीतील जीर्ण पोलीस क्वार्टर्स पाडणार - एसपी अमोल तांबे
लातूर, 01 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात पोलीस दलाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसह नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलीस प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. लेबर कॉलनी परिसरातील पोलीस वसाहतीची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील जीर्ण क्वार्टर्स
एसपी अमोल तांबे


लातूर, 01 मार्च (हिं.स.)।

लातूर जिल्ह्यात पोलीस दलाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसह नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलीस प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. लेबर कॉलनी परिसरातील पोलीस वसाहतीची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील जीर्ण क्वार्टर्स पाडून नवीन, आधुनिक व सुसज्ज निवासी इमारती उभारण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी घेतला आहे.

पाहणी दरम्यान वसाहतीतील एकूण 76 क्वार्टर्सपैकी केवळ 8 सदनिका वापरात असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित इमारती अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून अनेक ठिकाणी मोठी पडझड झालेली आहे.

पाहणीदरम्यान परिसरात अपुरी वीज व्यवस्था, सुरक्षा भिंतीचा अभाव तसेच मोठ्या प्रमाणात कचरा व अस्वच्छता असल्याचे आढळले. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही असामाजिक प्रवृत्तीचे लोक तेथे नशापाणी व इतर अवैध प्रकार करत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी मांडल्या.

या पार्श्वभूमीवर एसपी अमोल तांबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जुने क्वार्टर्स पाडून त्या जागी आधुनिक पोलीस निवासी संकुल उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्याचे निर्देश दिले. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना भविष्यात सुरक्षित व चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

तसेच परिसरातील अवैध धंदे व असामाजिक कृत्यांवर तात्काळ आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे विवेकानंदचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना गस्त वाढविणे व कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

पाहणीवेळी एसपी तांबे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पोलिसांच्या पुढाकाराबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन देण्यात आले.

लेबर कॉलनी येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासामुळे पोलीस कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande