अमरावतीतील धामणगाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा संताप
अमरावती, 01 मार्च (हिं.स.)दुतापूर (धामणगाव) येथील शेतकरी खरेदी-विक्री सहकारी समितीमार्फत हमीभाव योजनेअंतर्गत (PSS) चण्याच्या खरेदीला १ मार्चपासून सुरुवात होताच केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली. यंदा प्रतिक्विंटल ५७८५ रुपये हमीभाव जाहीर झाल्
धामणगाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा संताप; पाण्याविना उन्हात तासन्तास प्रतीक्षा हमीभावाच्या चण्याच्या खरेदीला सुरुवात;


अमरावती, 01 मार्च (हिं.स.)दुतापूर (धामणगाव) येथील शेतकरी खरेदी-विक्री सहकारी समितीमार्फत हमीभाव योजनेअंतर्गत (PSS) चण्याच्या खरेदीला १ मार्चपासून सुरुवात होताच केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली. यंदा प्रतिक्विंटल ५७८५ रुपये हमीभाव जाहीर झाल्याने पहिल्याच दिवशी शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलींनी माल घेऊन केंद्रावर दाखल झाले. मात्र, खरेदी केंद्रावरील व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.सकाळपासून उन्हाच्या तीव्रतेत शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत असून पिण्याच्या पाण्याची साधी व्यवस्था नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

“हमीभाव देतो म्हणतात, पण पाण्याचा ग्लासही देत नाहीत,” अशी तीव्र प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सावलीसाठी शेड नाही, बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था नाही आणि पाण्याचा टँकरही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.केंद्रावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरू असते. बायोमेट्रिक नोंदणी, कागदपत्र पडताळणी आणि मालाचे वजन यासाठी मोठा वेळ लागत असल्याने रांगा वाढत आहेत. अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून वृद्ध शेतकरी व महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांच्या मते, प्रशासनाने खरेदीला सुरुवात करण्यापूर्वी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे होते. “पाणी, सावली आणि बसण्याची सोय करा, अन्यथा आंदोलन छेडू,” असा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, समिती प्रशासनाने गर्दी लक्षात घेता प्रक्रिया सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. पिण्याचे पाणी, शेड आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था लवकरच केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.तथापि, हमीभावाच्या खरेदीसाठी आलेल्या अन्नदात्यांनाच जर मूलभूत सुविधा नाकारल्या जात असतील, तर ही व्यवस्था कोणासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांचा संताप आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande