
रायगड, 01 मार्च (हिं.स.)। माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे इंदापूर गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रा. तांबेवाडी, म्हापळ, ता. मंडणगड हे होळी सणानिमित्त मुंबईहून गावी आयशर बस (क्र. एमएच-४८-सीबी-४४९३) ने प्रवास करत होते. इंदापूर गावाच्या हद्दीत बस पंक्चर झाल्याने ती मुंबई-गोवा महामार्गावरील माहीज हॉटेलसमोर रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली. काही प्रवासी खाली उतरून उभे असताना मुंबईकडून गोव्याकडे जाणारी इर्टिगा कार (क्र. एमएच-०९-एफवाय-६६००) भरधाव वेगात आली.
आरोपी चालक, रा. निळफन, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर याने कार बेदरकारपणे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवली. कारने रस्त्याच्या कडेला उभ्या आयशर बसला डाव्या बाजूने घासून खाली उभ्या असलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली. या अपघातात प्रवाशांना लहान-मोठ्या तसेच गंभीर दुखापती झाल्या.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गु.र. नं. ६०/२०२६ अन्वये मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास माणगाव पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महामार्गावरील वेगमर्यादा आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके