
- उदगीरमध्ये संतापाची लाट; आरोपींवर कठोर शिक्षेची मागणी
लातूर, 01 मार्च (हिं.स.)
: येथील तादलापूर परिसरातील (ता. उदगीर) एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला हैदराबाद येथे नेऊन तिच्यावर तीन दिवस अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीस अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री आरोपीने आपल्या मित्राच्या मदतीने मुलीला गावातून बाहेर काढले. तिला वाहनाने उदगीर रेल्वे स्थानकावरून हैदराबादला नेण्यात आले. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या वडिलांनी गावात शोधाशोध केली; मात्र ती सापडली नाही. त्यानंतर ग्रामीण पोलीस ठाणे, उदगीर येथे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा क्रमांक ६७/२०२६ नोंदवून तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय तपासाच्या आधारे पोलिसांनी हैदराबाद येथे आरोपीसह मुलीचा शोध लावला. आरोपीस न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीत घेतले असता चौकशीत त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांचा समावेश करावा, पीडितेला तातडीने संरक्षण व आर्थिक मदत द्यावी, तसेच गुन्ह्यात सहभागी इतर सहआरोपींचा शोध घेऊन कठोर
कारवाई करावी, अशी मागणी मुलीच्या पालकांनी केली आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशीही त्यांची भूमिका आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis