
नांदेड, 01 मार्च (हिं.स.)।
नांदेड तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायत येथे जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचा जल अर्पण दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हर घर, नल से जल या योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध झाले असून ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या सकारात्मक सहभागामुळे व विशेषतः तरुणाईच्या योगदानामुळे ही योजना यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. भविष्यातही योजना शाश्वत व सुरळीत राहावी, वितरण वाहिन्या सुरक्षित ठेवाव्यात आणि पाण्याचा
अपव्यय टाळावा, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात ग्राम
स्वच्छतेने करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय ते पाणी टाकी परिसरापर्यंत जल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, महिला, ग्रामपंचायत पदाधिकारी, शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले. पाणी विषयक घोषवाक्ये देत जनजागृती करण्यात आली. टाकी परिसरात जलपूजन करण्यात आले व जलकलश मिरवणूक
काढण्यात आली. तसेच एफ. टी. के. किटद्वारे पाणी गुणवत्तेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले व ग्रामस्थांनी जल प्रतिज्ञा घेतली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब व जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मयूरकुमार
आंदेलवाड यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा योजनेची अधिकृत कागदपत्रे ग्रामपंचायतीस सुपूर्द करून हस्तांतरण समारंभझाला.
यावेळी पाणीपुरवठा योजना शाश्वतरीत्या चालविणे, स्त्रोत शाश्वत राखणे व जलसंधारणातून जल पुनर्भरणावर भर देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन मान्यवरांनी केले. सदर कार्यक्रमास पोलिस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis