
लातूर, 01 मार्च, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने अवैध शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम सुरू ठेवली असून त्याच मोहिमेअंतर्गत पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या धडक कारवाईत पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, लातूर व पोलीस स्टेशन गातेगाव यांच्या संयुक्त पथकाने मुरूड-अकोला चौक परिसरात छापा टाकून गावठी पिस्तुलसह तीन संशयित इसमांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 04.00 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन गातेगाव येथील अधिकारी व कर्मचारी शासकीय वाहनाने हद्दीत नियमित नाईट पेट्रोलिंग करीत असताना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. मुरूड-अकोला चौक परिसरात काही संशयित इसम थांबले असून त्यांच्याकडे अवैध शस्त्र असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल सुरू केली.
सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व गातेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी संयुक्तरीत्या साखरा पाटी परिसरात एकत्र येत पुढील कारवाईचे नियोजन केले.
पोलिसांनी मुरूड-अकोला चौक येथे पहाटे सुमारे 04.30 वा. सापळा रचून छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच तेथे उभे असलेले तीन इसम गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. पोलिसांनी पाठलाग करत तत्परतेने त्यांना ताब्यात घेत चौकशी केली.चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली
1)अजय गौतम लोमटे (वय 20 वर्षे, रा. फुलेनगर, परळी जि. बीड)
2)नयन सुधाकर वाडे (वय 26 वर्षे, रा. गंगासागर नगर, परळी वैजनाथ, जि. बीड)
3)सोमेश्वर सुभाष मिसाळ (वय 20 वर्षे, रा. फुलेनगर, परळी जि. बीड)
यापैकी अजय गौतम लोमटे याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक स्टीलची गावठी पिस्टल व मॅगझीन असा ₹30,000/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून सदर शस्त्र जप्त केले.आरोपीकडे शस्त्राचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले.त्यामुळे पोलीस स्टेशन गातेगाव येथे शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या शस्त्राचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला जाणार होता का याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, लातूर व पोलीस स्टेशन गातेगाव यांच्या संयुक्त पथकाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस ठाणे गातेगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे पोलीस अंमलदार संजय कांबळे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, जमीर शेख, प्रशांत स्वामी, विजय पाटील, व्यंकटेश निटूरे, आयुब शेख यांनी केली आहे. सदरच्या पथकाच्या सतर्कता, जलद नियोजन व समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी ठरली असून त्यामुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई पुढेही अशाच तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis