
लातूर, 01 मार्च (हिं.स.)।
अहमदपूर येथील शासकीय प्रशासकीय इमारतीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उभारण्यात आलेल्या अद्ययावत लिफ्टचे उद्घाटन आज राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. या इमारतीमध्ये विविध शासकीय कार्यालये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्या चढून जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. ही समस्या लक्षात घेऊन बाबासाहेब पाटील यांनी प्रशासकीय इमारतीत लिफ्ट उभारण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यांच्या या संकल्पनेची व सूचनेची तातडीने अंमलबजावणी करत प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना मंत्री महोदयांनी सांगितले की, प्रशासकीय सेवा घेताना सामान्य नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठांना कोणताही शारीरिक त्रास होऊ नये, हा या सुविधेमागील मुख्य उद्देश आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, अहमदपूर व चाकूर दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आणि विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या लिफ्ट सुविधेमुळे आता इमारतीतील सर्व कार्यालयांमध्ये पोहोचणे सुलभ झाले असून नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis