
लातूर, 01 मार्च (हिं.स.)।
अहमदपूर पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेले जाणारे ८ गोवंश वाचवले, ६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीसाठी अवैध रित्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी मोठी कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले आणि पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली. यामध्ये ५ लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप आणि १ लाख ४० हजार रुपये किमतीचे दोन गायी, चार कालवडी व दोन वासरे असा एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काळेगाव ते अहमदपूर रोडवर रुद्र बारजवळ पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपला (क्रमांक MH 24 BW 0609) थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये अत्यंत निर्दयीपणे आणि दाटीवाटीने आठ गोवंश प्राणी कत्तलीच्या उद्देशाने कोंबून नेले जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी चालक फयूम खयुम कुरेशी (वय ३४, रा. अफान कॉलनी, अहमदपूर) याला जागीच ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार तानाजी व्यंकट आरदवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९५/२०२६ नुसार प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोनि विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोह गणेश मिटकरी, सफो दिडगे व त्यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार दिडगे हे करत असून, गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पवित्रा घेतल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis