
बीड, 01 मार्च (हिं.स.)
बीड पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत अंबाजोगाईतून २८ किलो गांजा आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १३ लाख ७० हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परळी रोडवरील एका वसाहतीत अवैध विक्रीसाठी गांजा येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणी चौघांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबाजोगाई शहर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई यशस्वी केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis