होळी, धुलीवंदनानिमित्त बाजारपेठ सज्ज, खरेदीसाठी गर्दी
नांदेड, 01 मार्च (हिं.स.)। वाईट प्रवृत्तींचा नाश आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानले जाणारे होळी आणि धुलीवंदनाचा सण आला असून या निमित्ताने रंगांची मुक्त उधळण होणार आहे. त्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली असून खरेदीसाठी बालगोपाळांसह तरूणाईची गर्दी झाली
होळी, धुलीवंदनानिमित्त बाजारपेठ सज्ज, खरेदीसाठी गर्दी


नांदेड, 01 मार्च (हिं.स.)।

वाईट प्रवृत्तींचा नाश आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानले जाणारे होळी आणि धुलीवंदनाचा सण आला असून या निमित्ताने रंगांची मुक्त उधळण होणार आहे. त्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली असून खरेदीसाठी बालगोपाळांसह तरूणाईची गर्दी झाली आहे.

होळीच्या दिवशी लाकडे, गोवऱ्या आणून अग्नी पेटवून होळीला पुराणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. होळी पौर्णिमेला होलिका दहन करून वाईट विचार जाळले जातात तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला रंग खेळून आनंद, प्रेम आणि बंधुभाव साजरा केला जातो. एकमेकांवर रंगांची उधळण करत शुभेच्छा दिल्या जातात. सामाजिक एकोप्याचे प्रतीक मानले गेलेल्या या सणाच्या दिवशी रंगासोबत पाण्याची मुक्त उधळण केली जाते.

शहरातील वजिराबाद, जुना मोंढा, शिवाजीनगर, श्रीनगर, आनंदनगर, शेतकरी चौक, छत्रपती चौक, बर्की चौक, होळी, सिडको, हडको भागातील बाजारपेठा सणानिमित्त सज्ज झाल्या आहेत. धुलीवंदनासाठी लागणारे विविध प्रकारचे रंग, आकर्षक पिचकाऱ्यासह इतर साहित्य बाजारात आले असून ते खरेदी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून गर्दी होत आहे.

फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणारा होळीचा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा आहे. भारतात प्रमुख सणांपैकी एक होळी हा सण आहे, ज्याला 'रंगांचा सण' किंवा 'हुताशनी पौर्णिमा' असेही म्हणतात. थंडी संपून निसर्गात नवीन पालवी फुटत असताना, वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हा सण साजरा करण्याची प्रथा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande