

मुंबई, 01 मार्च (हिं.स.)। मुंबई ते विजयदुर्ग दरम्यानची बहुप्रतिक्षित रो-रो सेवा आजपासून अधिकृतपणे सुरू झाली असून कोकणातील प्रवाशांसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय ठरला आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून आता मुंबईहून विजयदुर्गला अवघ्या सहा तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. रस्तेमार्गाने साधारण १२ ते १३ तास लागणारा प्रवास आता निम्म्यावर येणार असून सुमारे सात तासांची मोठी बचत होणार आहे. विशेषतः गणेशोत्सव आणि शिमग्यासारख्या सणांच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा वरदान ठरणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई–विजयदुर्ग एम.टी.एम बोट फेरीचा अर्थात रो-रो जलवाहतूक सेवेला शुभेच्छा देत कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. या खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या च्या ट्विटला रि-ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी या बहुप्रतिक्षित सेवेच्या शुभारंभाचे स्वागत केले.
ही सेवा एम-टू-एम फेरी कंपनीमार्फत सुरू करण्यात आली असून ‘ एम-टू-एम प्रिन्सेस’ ही बोट या मार्गावर धावणार आहे. मुंबईतील भाऊचा धक्का येथून ही बोट आठवड्यातून दोन वेळा सुटणार आहे. दर बुधवार आणि शनिवार सकाळी ८ वाजता मुंबईहून प्रस्थान करून दुपारी २ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गुरुवार आणि रविवार दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून सुटून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत दाखल होईल.
या रो-रो सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना आपल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह प्रवास करता येणार आहे. त्यामुळे कोकणात सुटीसाठी किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना वाहन नेण्याची स्वतंत्र सोय करावी लागणार नाही. यामुळे वेळेची बचत तर होईलच, पण इंधनखर्च आणि टोलचाही मोठा खर्च वाचणार आहे. कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्याचीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी कोकणातील सागरी वाहतुकीला नवे आयाम देण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगितले. पुढील टप्प्यात महाड आणि रत्नागिरी या मार्गांचाही या सेवेत समावेश करण्याचा विचार सुरू असून त्यामुळे कोकणातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. या नव्या उपक्रमामुळे मुंबई आणि कोकण यांच्यातील अंतर केवळ किलोमीटरमध्येच नव्हे तर वेळ आणि सोयीसुविधांच्या दृष्टीनेही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule