
नाशिक, 01 मार्च, (हिं.स.)। जागतिक एचपी व्ही जनजागृती दिनाच्या पार्श्वभूमीवर नामको हॉस्पिटलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “HPV लसीकरण जनजागृती वॉकॅथॉन” उपक्रमास नाशिककर नागरिकांनी उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
“एक पाऊल कॅन्सर मुक्त समाजासाठी” या संकल्पनेतून आयोजित या वॉकॅथॉनमध्ये महिला, पुरुष, विद्यार्थी, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट प्रतिनिधी तसेच विविध शैक्षणिक संस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्यात आला.
या कार्यक्रमास मिसेज ग्लोबल यूनाइटेड एलीट – लाइफटाइम क्वीन नमिता कोहोक यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच उपजिल्हाधिकारी सौ. हेमांगी पाटील यांनीही मान्यवर उपस्थिती दर्शवून उपक्रमाला प्रेरणादायी पाठबळ दिले. हा उपक्रम नामको चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन सोहनलाल भंडारी आणि सेक्रेटरी शशिकांत पारख, समीर तुळजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
नामको चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, लायन्स क्लब, रोटरॅक्ट क्लबचे सदस्य तसेच विविध सहयोगी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
या वॉकॅथॉनचा मुख्य उद्देश गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करणे आणि HPV लसीकरणाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा होता. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये Cervical Cancer प्रतिबंधासाठी लसीकरण व नियमित तपासणीबाबत प्रभावी जनजागृती करण्यात यश आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीर तुळजापूरकर, डॉ. विशाखा जागीरदार, लक्ष्मीकांत पाठक आणि श्रेया गोलेच्छा यांनी विशेष प्रयत्न घेतले.
या भव्य प्रतिसादामुळे “Cancer Free India” या संकल्पनेला नाशिककरांनी दिलेला पाठिंबा अधोरेखित झाला असून, भविष्यातही अशा सामाजिक आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे जनजागृती सुरू ठेवण्याचा निर्धार नामको हॉस्पिटलने व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV