विदर्भातील प्रताप टेक्नोक्रॅट कर्मचाऱ्यांचा संप मागे
नेटवर्क खंडित केल्या प्रकरणी कारवाई नागपूर, 01 मार्च (हिं.स.) : विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती तसेच महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मोबाईल टॉवर आणि फायबर देखभालीचे काम करणाऱ्या प्रताप टेक्नोक्रॅट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप अखेर स्वतः
प्रताप टेक्नोक्रॅट कंपनीचा लोगो


नेटवर्क खंडित केल्या प्रकरणी कारवाई

नागपूर, 01 मार्च (हिं.स.) : विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती तसेच महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मोबाईल टॉवर आणि फायबर देखभालीचे काम करणाऱ्या प्रताप टेक्नोक्रॅट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप अखेर स्वतःहून मागे घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मोबाईल सेवा विस्कळीत झाली होती.

विदर्भात मोबाईल टॉवर आणि फायबरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी जियोने प्रताप टेक्नोक्रॅट या व्हेंडरची नियुक्ती केली आहे. संपादरम्यान काही कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी नेटवर्क सेवा खंडित केल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी टॉवर बंद ठेवणे तसेच फायबर लाईनची नासधूस केल्याने मोबाईल सेवा बाधित झाली. याचा फटका विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य ग्राहकांना बसला.कंपनीने या प्रकाराची गंभीर दखल घेत अनेक कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली असून संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, नेटवर्क पूर्ववत करण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संपकरी कर्मचाऱ्यांकडून धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

प्रताप टेक्नोक्रॅटकडून संपकरी कर्मचाऱ्यांनी केलेला “मागण्या मान्य झाल्या” हा दावा फेटाळण्यात आला आहे. मोबाईल सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने तिचे नुकसान करणे हा गंभीर गुन्हा मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी पुढे येत आहे. दरम्यान, संप मागे घेतल्यानंतर बहुतांश भागांतील मोबाईल नेटवर्क सेवा पूर्ववत होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande