
पुणे, 01 मार्च (हिं.स.)। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचा खजिना पोहोचवायचा असेल, तर पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक ज्ञानाची सांगड घालणे गरजेचे आहे. भारताच्या विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्यापर्यंत मूल्य शिक्षण पोहोचवणे हे शिक्षकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत यू.जी.सी. मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर यांच्या वतीने ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम क्षमता विकास उपक्रमांतर्गत दि. 23 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, यूजीसीचे सचिव डॉ. मनीष जोशी, तसेच कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ येथील संस्कृत विभाग प्रमुख व अधिष्ठाता डॉ. कलापिनी अगस्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. मनीष जोशी यांनी भारतीय ज्ञान प्रणालीचे शिक्षण युवकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत पारंपरिक आणि आधुनिक ज्ञानाच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ. कलापिनी अगस्ती यांनी भारतीय ज्ञान परंपरा हा केवळ अभ्यासाचा विषय नसून ते ज्ञान आचरणात रुजवणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिक्षकांनी लेखणीच्या माध्यमातून देशाचा इतिहास आणि संस्कृती यांचे पुनर्लेखन करून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडविल्यास युवा पिढी सक्षम होईल, असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष केंद्रे यांनी करतांना भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व अधोरेखित केले. सदर कार्यशाळेत एकूण 69 शिक्षक केरळ, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध महाविद्यालय व विद्यापीठातून सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु