नागपूरच्या एसबीएल एनर्जी कंपनीतील स्फोटात मृतांची संख्या 17 वर
नागपूर, 1 मार्च (हिं.स.) । नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राहुळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या वाढून 17 वर पोहोचली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वा
एसबीएल एनर्जी लि. कंपनी लोगो


नागपूर, 1 मार्च (हिं.स.) । नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राहुळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या वाढून 17 वर पोहोचली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

राहुळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) ही खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी औद्योगिक स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करणारी प्रमुख कंपनी आहे. रविवारी पहाटे सुमारे 5.30 वाजता कंपनीच्या प्रांगणात मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरवरपर्यंत ऐकू आल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

स्फोटाची तीव्रता इतकी होती की, घटनास्थळी असलेल्या इमारतींचा मलबा सुमारे 500 ते 700 मीटर अंतरावर फेकला गेला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवून तात्काळ मदतकार्याचे निर्देश दिले. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तसेच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

स्फोटानंतर कंपनी परिसरात भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या सुमारे चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले असून, त्यानंतर बचावकार्याला वेग देण्यात आला आहे. प्रशासनाकडून दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande