ठाणे : मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेची कठोर कारवाई
ठाणे, 01 मार्च (हिं.स.) : सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू असताना ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. अनेक करदात्यांनी वेळेत मालमत्ता कर भरून मनपेला सहकार्य केले असले तरी काही करदात
ठाणे : मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेची कठोर कारवाई


ठाणे, 01 मार्च (हिं.स.) : सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू असताना ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. अनेक करदात्यांनी वेळेत मालमत्ता कर भरून मनपेला सहकार्य केले असले तरी काही करदाते अद्याप थकबाकीदार आहेत. थकबाकीदारांवरील कारवाई अधिक कठोर व प्रभावी करण्याचे तसेच त्यांची नावे प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

सध्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरु असल्याने मालमत्ता करवसुलीची कारवाई महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत थकीत करदात्यांना नोटीस, वॉरंट बजावून मिळकत जप्त करणे, जाहिर लिलावाद्वारे मिळकतीची विक्री करणे यासारखी कारवाई करुन मिळकत सील करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. अद्यापपर्यंत ५१३ मालमत्ता जप्त केल्या असून, २२३ मालमत्ता सील करण्यात आल्या व १२०६ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरिता सर्व प्रभाग स्तरावरील संकलन केंद्रे दि.३१.०३.२०२६ पर्यंत सर्व शनिवारी सकाळी १०.३० ते सायं. ४.३० तसेच सर्व रविवार सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत कर संकलनाकरीता कार्यान्वीत ठेवण्यांत आले आहेत. करदाते ठाणे मनपाच्या २१ संकलन केंद्रापैकी कोणत्याही संकलन केंद्रावर त्यांचा मालमत्ता कर जमा करु शकतात.

त्याचप्रमाणे करदाते www.propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसेच GooglePay, Phonepe, Bhim App च्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरु शकतात.

करदात्यांना कराचे देयक पाहणे व कर भरणे सुलभ व्हावे याकरिता +९१ २२२५३३१५९० या WhatsApp ChatBot ही प्रणाली ठाणे मनपाने कार्यान्वीत केली असून, करदाते याद्वारे देखील सुलभतेने कर जमा करु शकतात.

तरी करदात्यांनी आपला थकीत मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे प्रशासनाच्या वतीने करदात्यांना आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande