
नाशिक, 01 मार्च (हिं.स.)। आजची युवा पिढी ही अधिक सक्षम आणि संवेदनशील आहे. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग आणि संस्कारांची जाणीव ठेवून वाटचाल केली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यांच्या हाती मराठी भाषेचे भविष्य निश्चितच सुरक्षित असल्याचा सूर आजच्या 'मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग' या विषयावरील परिसंवादात उमटला.
निमित्त होते, चौथ्या विश्व मराठी संमेलनामध्ये रावसाहेब थोरात सभागृह येथे आयोजित 'मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग' या परिसंवादाचे! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांनी यामध्ये सहभाग घेतला. अभिजीत ब्रह्मनाथकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव डाॅ किरण कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डाॅ शामकांत देवरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी आजचा युवा विचार कसा करतो, त्याच्यासमोरील आव्हाने, भाषेचे आव्हान ते कसे पेलणार, जागतिक पातळीवर मराठी भाषा पोहोचवण्याचे आव्हान आणि इतर भाषेची नव्या पिढीत झालेली सरमिसळ आदी विविध बाबीवर या दोन्ही वक्त्यांनी या परिसंवादात मनमोकळा संवाद साधला.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मराठी भाषा नवीन पिढीच्या तोंडी नवे रूप घेऊन येत आहे. त्यात आपल्याला स्थित्यंतर दिसते. अर्थात , मोबाइलच्या अतिवापरामुळे, कुटुंबपद्धती बदलामुळे अनेक प्रश्न समोर उभे ठाकल्याचे त्यांनी नमूद केले. मोबाईलचा योग्य वापर आपण कसा करतो,यावरही बरेच अवलंबून आहे. लैंगिक हिंसात्मक मजकूर फिल्म तयार करणाऱ्या टोळ्या जगभरात आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे या बाबींचा अतिरेक रोखणे आवश्यक आहे. आजची तरुण पिढी जे लेखन करते, ते आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व असल्याचे त्या म्हणाल्या. प्रेम आणि हिंसा हे एकतर हातात हात घालून चालत आहेत हे थोडस चिंता निर्माण करणारे असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आपण संयुक्त कुटुंब पद्धतीचे उदात्तीकरण करतो. पण हळूहळू चौकोनी आणि नंतर त्रिकोणी कुटुंब झाले आहे. आता तर बंधन नको वाटतात. संवाद नाही याचे कारण मुलांवर प्रचंड दबाव असल्याचे जाणवते. कुटुंबात लोकशाही नाही हे वास्तव काहीवेळा जाणवते. त्यामुळे जसजसे मुले मोठे होतात त्यांच्यातील आणि पालकातील संवाद तुटतो. मुलांना त्यांचे पार्टनर निवडण्याचा अधिकार तरी कुटुंबात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जिथे ऑनर किलिंग होते तिथे आदर्शवादी व्यवस्था कशी? आपण एका चौकटीत अडकलो आहोत. त्यामुळे जातीजातीत समाज अडकला आहे. आपण प्रागतिक होऊ, विकास करू, मात्र, समाज एकसंध होणे आवश्यक असल्याची जाणीव त्यांनी उदाहरणासहीत करून दिली.
आजची पिढी बदलली नाही. संवादाची परिभाषा बदलली आहे. शुद्धतेचे अवडंबर नको. त्यांच्या ओठी जी भाषा आहे तीच शब्दातून लेखनाच्या माध्यमातून उतरत असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
चंगळवादी संस्कृती ही आजच्या सध्याच्या परिस्थितीची खरी सूत्रधार आहे. स्टेटस सिम्बॉल मुळे अधिक नुकसान होत असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. युवा शक्ती मधे भारत खूप आघाडीवर आहे. पिढी समानता हा विषय चर्चिला जातो. मागील पिढीच्या यशोगाथा नवीन पिढीपुढे आली पाहिजेत.मराठी भाषा युवक मंडळ स्थापन करणे आणि त्यासाठी अनुदान देणे असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. युवकांसाठी लिहायला प्रोत्साहन मिळेल असे व्यासपीठ आवश्यक असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
स्त्री पुरुष समानता आवश्यक. वर्ण, लिंग, यातील दूजाभाव बदलला पाहिजे. घरातील कामे दोघांनी केली पाहिजे., अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV