
परभणी, 01 मार्च (हिं.स.)। शहरातील व्यापारी संघटनेच्या वतीने रविवारी (दि. १ मार्च २०२६) दुपारी ३.३० वाजता हाॅटेल निरज येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, उपमहापौर गणेश देशमुख, मोईन मौलवी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत डहाळे, कोठारी कॉम्प्लेक्समधील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी जुबेर चाऊस आदी उपस्थित होते.
बैठकीपूर्वी व्यापारी संघटनेच्या वतीने महापौर व उपमहापौर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महानगरपालिकेने दुकान गाळ्यांच्या भाडेकरारासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या अपील याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी न्यायालयाने नव्याने भाडेकरार करण्याबाबत सूचना दिल्याचे सांगत, कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय न करता, दुकान गाळे खाली करण्याची सक्ती न करता व अनामत रक्कम न घेता नियमानुसार भाडेवाढ करण्याची मागणी महापौर व उपमहापौर यांच्याकडे केली.
त्यावर महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा व उपमहापौर गणेश देशमुख यांनी नागरी सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. दुकान गाळे भाडेकराराचा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे सांगत सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे तसेच मालमत्ता कर व पाणीपट्टी वेळेत भरण्याचे आवाहन त्यांनी केले.
नियमानुसार भाडेकरार करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या वतीने आयुक्तांशी चर्चा करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis