


— ३५० एकर क्षेत्रात 2.50 लाख रोपांची लागवड
— ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ची टीमही उपस्थित
लखनऊ, 01 मार्च (हिं.स.)। उत्तर प्रदेशातील धार्मिक नगरी वाराणसी (काशी) येथे पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात रविवारी एक जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या डोमरी सुजाबाद या गावात सुमारे ३५० एकर क्षेत्रात विकसित होत असलेल्या आधुनिक ‘शहरी वन’मध्ये अवघ्या एका तासात 2,50,000 हून अधिक रोपांची लागवड करून धर्मनगरीने चीनचा वृक्षारोपणाचा विक्रम मोडीत काढला. या ऐतिहासिक क्षणी विक्रमाची नोंद घेण्यासाठी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ची टीमही उपस्थित होती.
महानगरपालिकेचे महापौर अशोक कुमार तिवारी आणि महानगरपालिका आयुक्त हिमांशु नागपाल यांच्या नेतृत्वाखाली या ऐतिहासिक प्रकल्पाची सुरुवात सकाळी 9:11 वाजता झाली आणि 10:11 वाजता ती पूर्ण करण्यात आली.वाराणसी महानगरपालिकेच्या नेतृत्वाखाली मियावाकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची मोजणी अद्याप सुरू आहे. या ऐतिहासिक क्षणाची अधिकृत नोंद करण्यासाठी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ची टीम घटनास्थळी उपस्थित होती. विशेष म्हणजे, 2018 मध्ये चीनमध्ये एका तासात 1,53,981 रोपे लावून जागतिक विक्रम करण्यात आला होता.
महापौर अशोक कुमार तिवारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, काशीवासीयांच्या सहकार्यामुळे हा जागतिक विक्रम शक्य झाला. सर्व रोपे जिवंत राखणे हे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यांनी पुढे सांगितले की, दुपारी साडेदोन वाजता मुख्यमंत्री वृक्षारोपण कार्यक्रमासंदर्भात सादरीकरण पाहणार असून प्रमाणपत्रांचे वितरणही करणार आहेत.
या उपक्रमात महानगरपालिकेचे सुमारे पाच हजार कर्मचारी, विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, एनडीआरएफ, 39 जीटीसी, उत्तर प्रदेश पोलीस, सिव्हिल डिफेन्स, सामाजिक संघटना, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस विद्यार्थी तसेच काशीतील नागरिक सहभागी झाले होते. अंदाजे पंधरा हजार लोकांनी या जागतिक विक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला.
‘शहरी वन’मध्ये गंगा घाटांच्या नावावर 60 विभाग या ‘शहरी वन’ची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्याची रचना संपूर्ण वनक्षेत्र 60 विभागांत विभागण्यात आले आहे. प्रत्येक विभागाला काशीतील प्रसिद्ध गंगा घाटांची नावे देण्यात आली आहेत, जसे की दशाश्वमेध घाट, ललिता घाट, नया घाट, केदार घाट, चौसट्टी घाट, मानमंदिर घाट आणि शीतला घाट. प्रत्येक विभागात सुमारे पाच हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मते, या ‘शहरी वन’मुळे गंगा किनाऱ्यावर एक हिरवागार ‘मिनी काशी’चा अनुभव निर्माण होईल. डोमरी येथे विकसित होत असलेले हे शहरी वन भावी पिढ्यांसाठी ‘ऑक्सिजन बँक’ ठरेल. हे आध्यात्मिक शांतता आणि आधुनिक अर्थकारण यांचे अनोखे उदाहरण आहे. ही योजना केवळ हरितीकरणापुरती मर्यादित नसून महानगरपालिकेसाठी उत्पन्नाचे मोठे साधन ठरणार आहे.
मध्य प्रदेशातील एमबीके संस्थेसोबत झालेल्या करारानुसार तिसऱ्या वर्षापासूनच महानगरपालिकेला दरवर्षी दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल, जे सातव्या वर्षापर्यंत वाढून सात कोटी रुपये वार्षिक इतके होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule