
पुणे, 01 मार्च, (हिं.स.)। महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या पात्र आणि मतदारयादीत नाव समाविष्ट असलेल्या ज्या आजीव सभासदांना, परिषदेच्या सध्या चालू असलेल्या निवडणूक प्रक्रियेची मतपत्रिका टपालामार्फत (पोस्ट) मिळाली नसल्यास, संबंधित आजीव सभासदांना मसापच्या मतदान केंद्रावर प्रत्यक्ष येऊन मतदान (दुबार) करता येणार आहे.
ही दुबार मतदान प्रक्रिया बुधवार (दि.4) ते शुक्रवार (दि.6) या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 4 या वेळेत मसापच्या कार्यालयात होणार असून, कार्यालयात येऊन सभासदांना मतदान करता येणार आहे. शुक्रवारनंतर (दि.6) मतदानासंदर्भात कोणत्याही प्रकारचा विनंती अर्ज स्वीकारला जाणार नाही, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी, सहनिवडणूक अधिकारी संजीव खडके आणि गिरीश केमकर यांनी दिली.
सध्या मसापची 2026 ते 2031 साठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. पात्र आणि मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या आजीव सभासदांना टपालाद्वारे मतपत्रिका घरी पाठविण्यात येत आहेत. परंतु टपालाने मतपत्रिका न मिळाल्यास संबंधित आजीव सभासदांनी स्वतः निवडणूक मंडळाकडे, वरील निर्देशित कालावधीतच मसाप निवडणूक मंडळाच्या पुणे कार्यालयात, आपल्या आधार कार्डाच्या स्वसाक्षांकित प्रतीसह, अर्ज करावा, या अर्जामध्ये मतपत्रिका उपलब्ध न होण्याचे किंवा न मिळण्याचे कारण स्पष्टपणे नमूद करावे, दुबार मतदानासाठी आलेल्या विनंती अर्जाची, निवडणूक कार्यालय, उपलब्ध कागदपत्रांवरून खात्री करेल, पूर्ण शहानिशा केल्यानंतरच, संबंधित आजीव सभासदास लागू असलेल्या दुबार मतपत्रिका दिल्या जातील आणि त्याची नोंद नोंदवहीत (रजिस्टर) करून अशा सभासदाची सही घेतली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु