
सोलापूर, 01 मार्च (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध सेवा व आर्थिक प्रकरणांमध्ये होत असलेल्या प्रशासकीय दिरंगाईमुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मेडिकल फाईल, सेवा निवृत्तीपूर्व वेतन पडताळणी तसेच जुनी पेन्शन योजनेतील अंशदान खात्यात वर्ग न करणे, यासारख्या गंभीर प्रश्नांकडे जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना शिक्षकांतून व्यक्त होत आहे.
शिक्षकांनी पगारातून नियमित जमा केलेली रक्कम वेळेत मिळत नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. मेडिकल फाईल मंजुरीसाठी वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी आहेत. सेवानिवृत्तीच्या वेळी वेतन पडताळणीचे नियोजन करण्यात येत असले तरी प्रत्यक्ष काम पूर्ण होत नसल्याने निवृत्त शिक्षकांना लाभ मिळण्यास विलंब होत आहे. शिक्षकांना त्यांच्या वैयक्तिक आजारपणासाठी तसेच आई, पत्नी, वडील, मुलगा, मुलगी या कुटुंबीयांना वैद्यकीय खर्च शासनाकडून मिळतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड