अष्टविनायक महामार्गावरील निकृष्ट कामांविरोधात रास्ता रोको
पुणे, 01 मार्च (हिं.स.)। अष्टविनायक महामार्गावरील अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधात मलठण व सोनेसांगवी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. रखडलेल्या कामांमुळे आणि साईडपट्ट्यांचे मजबुतीकरण न झाल्याने अ
अष्टविनायक महामार्गावरील निकृष्ट कामांविरोधात रास्ता रोको


पुणे, 01 मार्च (हिं.स.)।

अष्टविनायक महामार्गावरील अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधात मलठण व सोनेसांगवी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. रखडलेल्या कामांमुळे आणि साईडपट्ट्यांचे मजबुतीकरण न झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

गेल्या दोन दिवसांपूर्वीच मलठण गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात अनिल काशिनाथ दाते व रोहित राजू भोसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला.

रांजणगाव गणपतीकडे जाणाऱ्या या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वीही अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत-झाडे, खचलेल्या साईडपट्टया, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, गटार लाईनची दुरवस्था व दिशादर्शक फलकांची झालेली मोडतोड आणि अर्धवट कामे यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच, परिसरातील खाणकामांमुळे अवजड वाहने वेगाने धावत असल्याने अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना वारंवार सूचना देऊनही रखडलेली कामे पूर्ण करण्यात आलेली नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande