शेअर बाजारात ‘मॉक ट्रेडिंग’ची तालीम
नवी दिल्ली, 14 मार्च (हिं.स.)। सामान्यतः शनिवार आणि रविवार या दिवशी शेअर बाजार बंद असतो. मात्र आज म्हणजेच १४ मार्च रोजी बीएसई आणि एनएसई सुरू राहणार आहेत. आज इक्विटी, करन्सी आणि कमोडिटीसह सर्व प्रमुख विभागांमध्ये ट्रेडिंग होणार असले तरी हे नियमित व्
Mock Trading Rehearsal Stock Market


नवी दिल्ली, 14 मार्च (हिं.स.)। सामान्यतः शनिवार आणि रविवार या दिवशी शेअर बाजार बंद असतो. मात्र आज म्हणजेच १४ मार्च रोजी बीएसई आणि एनएसई सुरू राहणार आहेत. आज इक्विटी, करन्सी आणि कमोडिटीसह सर्व प्रमुख विभागांमध्ये ट्रेडिंग होणार असले तरी हे नियमित व्यवहाराचे सत्र नसून ‘मॉक ट्रेडिंग सेशन’ असणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ही शेअर बाजाराची एक प्रकारची तालीम आहे. या सत्रात बाजारातील सर्व सिस्टीम खऱ्या मार्केटप्रमाणे चालतील, मात्र खऱ्या पैशांची देवाणघेवाण होणार नाही.

या विशेष सत्राचा मुख्य उद्देश बीएसई आणि एनएसईच्या तांत्रिक पायाभूत सुविधांची चाचणी घेणे हा आहे. बाजारात कधी कधी प्रचंड व्यवहारांचा ताण किंवा तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत ट्रेडिंग सिस्टीमवर मोठा दबाव येतो. या दबावाखालीही सिस्टीम सुरळीतपणे कार्य करते का, याची खात्री करण्यासाठी हे मॉक सेशन आयोजित केले जाते. आजची ही ड्रिल एक्सचेंजच्या प्रायमरी साइटबरोबरच ‘डिझास्टर रिकव्हरी’ (DR) साइटवरही केली जाणार आहे. जर मुख्य सर्व्हरमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली, तर बॅकअप सिस्टीम तात्काळ सुरू होऊन व्यवहार सुरळीत ठेवू शकते का, याची तपासणी या प्रक्रियेत केली जाईल.

या मॉक ट्रेडिंगदरम्यान सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो की, आज शेअर्स खरेदी-विक्री केल्यास त्याचा आपल्या बँक खात्यावर किंवा पोर्टफोलिओवर काही परिणाम होईल का? मात्र याचे उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ असे आहे. कारण हे सत्र केवळ टेस्टिंग आणि ट्रेनिंगसाठी आयोजित केलेले असते. या कालावधीत केलेल्या कोणत्याही व्यवहाराचा गुंतवणूकदारांच्या प्रत्यक्ष पोर्टफोलिओवर परिणाम होणार नाही. यात खऱ्या पैशांची देवाणघेवाण होणार नाही आणि कोणतेही मार्जिनही लागणार नाही. त्यामुळे हे सर्व व्यवहार ‘नॉन-बाइंडिंग’ स्वरूपाचे असतील.

या मॉक सेशनमध्ये इक्विटीबरोबरच इक्विटी डेरिव्हेटिव्हज, करन्सी, कमोडिटी डेरिव्हेटिव्हज तसेच इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट या विभागांमध्येही ट्रेडिंगचे अनुकरण केले जाणार आहे. विशेषतः जे ब्रोकर्स आणि ट्रेडर्स थर्ड-पार्टी सॉफ्टवेअर किंवा अल्गोरिदमिक ट्रेडिंगचा वापर करतात, त्यांना त्यांच्या रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम आणि ट्रेडिंग अल्गोरिदमची प्रत्यक्ष बाजारासारख्या परिस्थितीत चाचणी करण्याची संधी मिळणार आहे. या सत्रादरम्यान ब्लॉक डील्स, ट्रेडिंग हॉल्ट आणि रिस्क-रिडक्शन मोड यांसारख्या गुंतागुंतीच्या परिस्थिती निर्माण करून सिस्टीमवर कृत्रिम दबाव टाकला जाईल, ज्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत बाजाराची यंत्रणा किती सक्षम आहे याची खात्री करता येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande