
मुंबई, 16 मार्च (हिं.स.)। भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात वेगाने वाढणाऱ्या एथर एनर्जी या कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर मर्यादित कालावधीसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. कंपनीकडून चालू मार्च महिन्यात स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तब्बल 20 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही ऑफर फायदेशीर ठरणार आहे.
कंपनीने जाहीर केलेल्या या ऑफरमध्ये फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर Ather Rizta S तसेच लोकप्रिय Ather 450S या मॉडेल्सचा समावेश आहे. 31 मार्चपर्यंत या स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एकत्रितपणे 20 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना 10 हजार रुपयांपर्यंत क्रेडिट कार्ड डिस्काउंट, सुमारे 6500 रुपयांपर्यंत रोख सवलत आणि 3500 रुपयांची एक्सटेंडेड कंपोनंट वॉरंटी देण्यात येत आहे. त्यामुळे स्कूटरच्या एकूण किमतीत लक्षणीय बचत होणार आहे. ही ऑफर देशभरातील एथर एक्सपीरियन्स सेंटर्समध्ये 31 मार्चपर्यंत वैध असेल.
किंमतींबाबत बोलायचे झाल्यास Ather Rizta S ही स्कूटर सध्या सुमारे 1,04,758 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. तर Ather 450S या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1,13,100 रुपये आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या ऑफर्सचा उद्देश ग्राहकांना इलेक्ट्रिक स्कूटर अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे हा आहे. याशिवाय ग्राहकांना केंद्र सरकारच्या PM E-Drive Scheme अंतर्गत सुमारे 5000 रुपयांपर्यंत अतिरिक्त रोख अनुदानही मिळू शकते.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर Ather Rizta S या स्कूटरमध्ये 2.9 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 123 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. घरच्या चार्जरवर ही स्कूटर सुमारे 6 तास 30 मिनिटांत पूर्ण चार्ज होते. सुमारे 125 किलो वजनाच्या या स्कूटरमध्ये 4.3 kWh मोटर देण्यात आली असून तिचा टॉप स्पीड 80 किमी प्रतितास इतका आहे.
तर Ather 450S या मॉडेलमध्येही 2.9 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. पूर्ण चार्जवर ही स्कूटर सुमारे 122 किलोमीटरपर्यंत धावू शकते. यामध्ये 5.4 किलोवॅट क्षमतेची मोटर देण्यात आली असून स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास इतका आहे. आधुनिक तंत्रज्ञान, चांगली रेंज आणि प्रीमियम फीचर्समुळे या दोन्ही स्कूटर्सना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मार्च महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या या ऑफरमुळे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही योग्य संधी ठरू शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule