
मुंबई, 16 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून भारतात गॅस सिलेंडरची मागणी अचानक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर इंडियनऑइल कॉर्पोरेशनचे एलपीजी बुकिंगसाठी वापरले जाणारे इंडियनऑइल वन हे मोबाईल अॅप भारतातील गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअर वरील फ्री अॅप्सच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचले आहे. विशेष म्हणजे या अॅपने लोकप्रिय एआय अॅप चॅटजीपीटीलाही मागे टाकत नंबर-1 स्थान मिळवले आहे.
मध्यपूर्वेतील तणावामुळे जगातील महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी या समुद्री मार्गावर पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे एलपीजी पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. याचा थेट परिणाम भारतातील ग्राहकांवर झाला असून अनेक शहरांमध्ये एलपीजी वितरण केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यवसायिकांनी गॅसची कमतरता आणि वाढलेल्या किमतींमुळे मेनू कमी केले किंवा काही पदार्थ तात्पुरते बंद केले आहेत.
दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये एलपीजी सिलेंडरची काळाबाजारात विक्री आणि साठेबाजीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. गॅस मिळण्यात अडचणी येत असल्याने अनेक ग्राहक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कुकिंग उपकरणांकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर इंडक्शन कुकटॉपसारख्या उपकरणांची मागणी वाढल्याचेही दिसत आहे.
भारतामध्ये सध्या सुमारे 33.4 कोटी घरांमध्ये एलपीजी कनेक्शन असून सुमारे 1.5 कोटी घरांमध्ये पाइप्ड नॅचरल गॅस म्हणजेच पीएनजी कनेक्शन उपलब्ध आहे. एलपीजीमध्ये पोर्टेबल सिलेंडरद्वारे इंधन पुरवले जाते, तर पीएनजीमध्ये पाइपलाइनद्वारे थेट घरांपर्यंत गॅस पोहोचतो.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत दररोज सरासरी 55.7 लाख एलपीजी सिलेंडरची बुकिंग होत होती. मात्र 12 मार्च रोजी ही संख्या 35 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 75.7 लाखांपर्यंत पोहोचली. वाढलेल्या मागणीमुळे अनेक ठिकाणी ऑनलाइन बुकिंग प्रणालीवर ताण आला असून काही राज्यांमध्ये बुकिंग प्लॅटफॉर्म तात्पुरते बंद पडल्याचीही नोंद झाली आहे.
दरम्यान, इंडियनऑइल वन हे मोफत डाउनलोड करता येणारे अॅप असून त्याद्वारे एलपीजी सिलेंडर बुक करणे, डिलिव्हरी ट्रॅक करणे, नवीन गॅस कनेक्शन घेणे किंवा वितरक बदलणे यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत. तसेच या अॅपच्या सर्च फीचरच्या मदतीने जवळचे पेट्रोल पंप किंवा एलपीजी वितरक शोधणेही शक्य आहे. अॅप विश्लेषण करणाऱ्या सेन्सर टॉवरच्या आकडेवारीनुसार, मागील 30 दिवसांत या अॅपचे चार दशलक्षांहून अधिक डाउनलोड झाले आहेत, जे कंपनीच्या इतर अॅप्सपेक्षा लक्षणीय जास्त आहेत.
एलपीजीबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे देशभरात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सिलेंडरची ‘पॅनिक बुकिंग’ सुरू झाली आहे. त्यामुळेच इंडियनऑइल वन अॅपला अचानक मोठी लोकप्रियता मिळाली असून ते भारतातील अॅप स्टोअर चार्टमध्ये अव्वल स्थानावर पोहोचले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule