निवृत्त प्राध्यापकाचा खून करून मृतदेह जंगलात पुरला; ४० दिवसांनी प्रकार उघडकीस
छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा परिसरातून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवृत्त विभागप्रमुखांचा आर्थिक वादातून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गु
अ


छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा परिसरातून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवृत्त विभागप्रमुखांचा आर्थिक वादातून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तपासातून हा प्रकार समोर आला असून मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल ४० दिवसांनंतर जंगलातील खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढला.

ज्योतीनगर येथील अभिरिका अपार्टमेंटमध्ये राहणारे राजाभाऊ सुभराव लोंढे (वय ६०) हे बेपत्ता झाले होते. त्यांच्या भावाने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान लोंढे हे शेवटचे त्यांचे मित्र दौलताबाद येथील फार्महाऊसवर पार्टीसाठी गेले असल्याचे समोर आले.

प्राथमिक चौकशीत आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पार्टी संपल्यानंतर पहाटे सिग्मा हॉस्पिटलजवळ लोंढे यांना सोडल्याचे त्याने सांगितले होते. मात्र महिना उलटूनही लोंढे यांचा पत्ता न लागल्याने नातेवाईकांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता आरोपींच्या जबाबात विसंगती आढळली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता विशाल राठोडने गुन्ह्याची कबुली दिली. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हा खून केल्याचे तपासात समोर आले.

पार्टीमध्ये लोंढे यांना दारू पाजल्यानंतर शहराकडे परत येताना साजापूर शिवारातील रेल्वे पुलाजवळ त्यांच्या डोक्यात पिस्तूलने गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी मृतदेह गेवराई तांड्याजवळील जंगलात नेऊन आधीच खोदलेल्या खड्ड्यात टाकून जेसीबीच्या साहाय्याने माती टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande