
परभणी, 16 मार्च (हिं.स.)मानवत शहरातील क्रांती चौक परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धाडसी चोरी उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी घबराट निर्माण झाली आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख ९२ हजार रुपये (इ.स.2010-2011 ची किंमती नुसार अंदाजे)-इतकी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव दत्तात्रयसा बाकळे (वय ७१) हे आपल्या पत्नीसह १ मार्च रोजी मुलाला भेटण्यासाठी पुणे येथे गेले होते. त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घरावर डल्ला मारला. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटाचे लॉकर फोडून सोन्याचे दागिने चोरून नेले.
शेजारी राहणाऱ्यां काकूंनी घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून बाकळे यांच्या पत्नीला फोनवरून माहिती दिली. त्यानंतर बाकळे यांनी आपल्या पुतण्याला घरी पाठवले असता घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, बाकळे कुटुंब पुण्यातून परतल्यानंतर घरातील वस्तूंची पाहणी केली.
चोरीला गेलेला मुद्देमाल
चोरट्यांनी कपाटातील लॉकर फोडून खालील सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे –
सोन्याच्या पाटल्या – ५ तोळे (किंमत ६०,००० रुपये)
सोन्याचे गंठण – ६ तोळे (किंमत ७२,००० रुपये)
सोन्याचे लकेट – २ तोळे (किंमत ८०,००० रुपये)
सोन्याच्या अंगठ्या – १ तोळा (किंमत ४०,००० रुपये)
सोन्याच्या रिंगा – १ तोळा (किंमत ४०,००० रुपये)
या सर्व दागिन्यांची किंमत हि दोन लाख ब्यांनव हजार अशी होते पण हिच किंमत चालू भावानुसार अंदाजे 23 ते 24 लाख होईल,
घरातील दागिन्यांच्या पावत्या शोधण्यात वेळ गेल्यामुळे मानवत पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३३१(४) व ३०५(a) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक संदीप आनंदराव बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis