
अमरावती, 16 मार्च (हिं.स.)। जुना बायपासवरील गोल्डन आर्क बार ऍण्ड रेस्टॉरंटमध्ये शनिवारी अन्नधान्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड घालून पाहणी केली असता वेगवेगळ्या कंपनीचे सहा घरगुती गॅस सिलिंडर त्यांनी जप्त करून राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुदामचंद झांबाणी (वय ६७, रा. कंवरनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या मालकाचे नाव आहे.शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्यामुळे अन्नधान्य वितरण विभागाने कंबर कसली आहे. शहरातील काही हॉटेल्स व बार अॅण्ड रेस्टॉरंटची तपासणी सुरू केली आहे. दुपारी पथकाला माहिती मिळाली की गोल्डन आर्क बार ऑण्ड रेस्ट्रॉरंटमध्ये घरगुती गॅस सिलिंडर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले आहे. यामाहितीच्या आधारे पथकातील अधिकाऱ्यांनी हॉटेलची पाहणी केली असता हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे सहा घरगुती गॅस सिलिंडर मिळून आल्याने गॅस सिलिंडर जप्त केले. याघटनेत राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी