
अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की, पंचनामेही फाडलेअमरावती, 16 मार्च (हिं.स.) । व्यवसायासाठी वापरले जाणारे घरगुती सिलेंडर जप्त करण्याची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पथकाला जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची घटना दर्यापूर येथे रविवारी घडली. अधिकाऱ्यांनी जप्त केलेले सिलेंडर संतप्त जमावाने चक्क पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकारही घडला. या घटनेमुळे परिसरात तणाव वाढल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले, मात्र सिलेंडर पळवणाऱ्यापैकी एकही जण पोलिसांच्या हाती लागला नाही.दर्यापूरमधील अंजनगाव टी-पॉईंट परिसरातील काही हॉटेलमध्ये कारवाई सुरु असताना रविवारी हा प्रकार घडला. व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलेंडरचा वापर सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरुन महसूल विभागाने कारवाई सुरु केली. तसेच 15 सिलेंडर जप्त केले. ही कारवाई सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. जमावाने अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करत पंचनामे फाडले. जप्त केलेले काही सिलेंडरही सरकारी वाहनातून काढून काहीजण ते घेऊन निघून पळून गेले. याप्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दर्यापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासभरा नंतरही सिलेंडर घेऊन गेलेल्या व्यक्तींपैकी कोणीही हजर झाले नाही. नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी