
बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांचे सीएमआयएला आश्वासन
छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)।एलएनजी एलपीजीच्या उपलब्धतेअभावी उद्योगांना भेडसावत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर सीएमआयएतर्फे प्रभावित उद्योग प्रतिनिधी आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांमध्ये सीएमआयए सभागृहात बैठक झाली. या बैठकीत सीएमआयएचे मानद सचिव मिहीर सौन्दगलेकर यांनी उद्योग क्षेत्राच्या वतीने सद्यस्थिती मांडत विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत एलएनजी पुरवठा अधिक वेगाने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
ज्यांना एलएनजीची गरज आहे त्यांनी बीपीसीएलकडे आपली नोंदणी करून आवश्यक मागणी कळवावी, जीएसए करार पूर्ण करावा आणि दरम्यानच्या काळात आपल्या उद्योग परिसरातील अंतर्गत पाइपलाइनची कामे पूर्ण करावीत. जेणेकरून पुरवठा सुरू करताना विलंब होणार नाही असे आवाहन बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी यावेळी उद्योगांना आवाहन केले. सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव मच्छर यांनी उद्योगांना संस्थेच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीसाठी सीएमआयए उपाध्यक्ष अथर्वेशराज नंदावत, मानद सचिव मिहीर सौन्दगलेकर, कोषाध्यक्ष सौराभछल्लाणी, बीपीसीएलचे राजीव कुमार, मिलिंद लभाणे, मनोज कुमार जाधव, अनुपम श्रीवास्तव, पुनीत गुप्ता आणि सचिन साळुंखे यांच्यासह ५० उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.
माहितीनुसार, सध्या विद्यमान ग्राहकांना एलएनजीचा पुरवठा नियमितपणे सुरू असून पुरवठ्या कोणतीही टंचाई नाही. ज्या उद्योगांनी गॅस सप्लाय अॅग्रीमेंट स्वाक्षरी आणि आवश्यक देयक प्रक्रिया पूर्ण केली आहे अशाकंपन्यांना प्राधान्याने एलएनजी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. सुमारे १० उद्योगांनी आज गॅस सप्लाय ऍग्रीमेंट केले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या उद्भवलेली मीटर उपलब्धतेची समस्या देखील तातडीने सोडविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis