
रुग्णालय उद्ध्वस्त झाल्याचा अफगाणिस्तानचा आरोप
काबूल,17 मार्च (हिं.स.) : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे सोमवारी उशिरा रात्री झालेल्या हवाई हल्ल्यात मृतांचा आकडा 400 वर पोहोचल्याची माहिती अफगाणिस्तान सरकारने दिली आहे.
अफगाणिस्तानमधील सत्ताधारी प्रशासनाने हा हल्ला देशाच्या सीमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले असून त्याला प्रत्युत्तर दिले जाईल असेही स्पष्ट केले आहे. दोन्ही शेजारी देशांमधील संघर्ष आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे.तालिबानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शराफत जमान यांनी सांगितले की व्यसनमुक्ती रुग्णालयाचा मोठा भाग पूर्णपणे नष्ट झाला आहे. हल्ल्यानंतर अनेक तासांपर्यंत अग्निशमन दल इमारतीतील आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी रुग्णालयातील रुग्णांवर झालेला हल्ला अमानुष असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अफगाणिस्तानचे उप-सरकारी प्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी आज, मंगळवारी सकाळी सांगितले की, अमली पदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठी उपचार करणाऱ्या एका रुग्णालयावर पाकिस्तानने हवाई हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून मलब्यातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. फितरत यांनी सांगितले की सोमवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात रुग्णालयाच्या इमारतीचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. मृतांची संख्या 400 वर पोहोचली असून सुमारे 250 जण जखमी झाल्याची माहिती आहे. बचाव पथके इमारतीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा तसेच ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान पाकिस्तानने रुग्णालयावर हल्ला केल्याचा आरोप फेटाळला आहे. पाकिस्तानच्या अधिकृत निवेदनानुसार काबूल आणि पूर्व अफगाणिस्तानात सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईत कोणत्याही नागरी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही. पाकिस्तानने सांगितले की त्यांच्या कारवाईचे लक्ष्य फक्त दहशतवादी गट होते. सोमवारी दोन्ही देशांच्या सीमेजवळ झालेल्या तीव्र गोळीबारानंतर हा हवाई हल्ला करण्यात आला असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने मात्र म्हटले आहे की या कारवाईत अचूकपणे लष्करी ठिकाणे आणि दहशतवादी मदत संरचना लक्ष्य करण्यात आल्या. यात अफगाण तालिबानचे तांत्रिक उपकरणे, दारुगोळ्याचे साठे तसेच काबूल आणि नंगरहार येथे लपून बसलेल्या पाकिस्तानविरोधी दहशतवाद्यांनाही लक्ष्य करण्यात आले.
यासोबतच पाकिस्तान सरकारने सांगितले की ही कारवाई अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली होती, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त नुकसान होऊ नये. रुग्णालयावर हल्ला झाल्याचा अफगाणिस्तानचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी