
सोलापूर, 17 मार्च, (हिं.स.)। इस्राईल - इराण युद्धाचा थेट फटका आता सर्वच स्तरातील घटकांना बसू लागला आहे. येथील चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर असलेल्या इस्काॅन मंदिरातील अन्नछत्रालाही गॅस टंचाईचा मोठा फटका बसला आहे. येथे सध्या चुली पेटवून प्रसाद तयार करण्याचे काम सुरू आहे. तीन दिवसांपासून लाकूड फाटा आणून त्यावर मर्यादित भोजन तयार करून ते भाविकांना दिले जाते.पंढरपुरातील सर्वसामान्य कुटुंबीयांनाही गॅस टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. गॅस तुटवड्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे.
पंढरपुरात महिलांनी भर उन्हात रांगा लावूनही त्यांना गॅस मिळाला नाही. त्यामुळे अनेक महिलांनी संताप व्यक्त केला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर सिलिंडरसाठी महिलांची ससेहोलपट होत असल्याचे चित्र आहे.सध्या गुढीपाडवा आणि रमजान ईद या सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. परंतु घरात गॅस नसल्याने महिलांची मोठी पंचायत झाली झाली आहे. अनेक नागरिकांच्या घरात मागील आठ दिवसांपासून गॅस पोचला नाही. त्यामुळे अशा गोरगरीब कुटुंबांची परवड सुरू आहे. सोमवारी सकाळपासूनच शहरातील गॅस वितरकांनी गॅस संपल्याचे बोर्ड लावले आहेत. तरीही येथील गॅस वितरणाच्या ठिकाणी दिवसभर लोकांनी रांगा लावल्याचे दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड