
लातूर, 17 मार्च (हिं.स.) : अहमदपूर तालुक्यातील सामाजिक विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी येत्या 25 मार्च 2026 पूर्वी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी केले आहे.
राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत दिव्यांग नागरिकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना यांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांचे युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड, ई-दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड यांचे संलग्नीकरण अनिवार्य केले आहे.
तहसीलदार पांगरकर यांनी सांगितले की, संबंधित लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड किंवा ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्डाची छायाप्रत आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे वेळेत सादर करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे आपल्या गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयातील संबंधित विभागात जमा करता येणार आहेत.
या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ विनाखंड आणि नियमितपणे मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्व पात्र दिव्यांगांनी प्रशासनाला सहकार्य करत मुदतीपूर्वी कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis