
नवी दिल्ली, 17 मार्च (हिं.स.) : अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एका महत्त्वपूर्ण निर्णयात, लोकसभेने 8 विरोधी खासदारांचे निलंबन रद्द केले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सभागृहात ठराव मांडल्यावर हा निर्णय घेण्यात आला. यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निलंबन रद्द केल्याची घोषणा केली, ज्यामुळे खासदारांना कामकाजात पुन्हा सहभागी होण्याची परवानगी मिळाली. निलंबन रद्द झाल्यानंतर ज्या 8 खासदारांना दिलासा मिळाला आहे, त्यांमध्ये गुरजीत सिंग औजला, हिबी ईडन, डीन कुरियाकोस, अमरिंदर सिंग राजा वॉरिंग, बी. मणिकम टागोर, डॉ. प्रशांत पडोळे, किरण कुमार रेड्डी आणि एस. वेंकटेशन यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांच्यासह तीन खासदारांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. यापूर्वी, सपाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी त्याचे समर्थन केले होते. धर्मेंद्र यादव म्हणाले की, सत्ताधारी पक्षानेही सभागृहाच्या शिस्तीचा आदर केला पाहिजे. त्यांनी विशेषतः भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना याची काळजी घेण्याचे आवाहन केले. यानंतर सत्ताधारी पक्षाने सभागृहात गोंधळ सुरू केला. सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना सांगितले, फलक आणि एआय-निर्मित प्रतिमा प्रदर्शित करू नका..
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी या आठ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावर सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन करणे, गोंधळ घालणे आणि अध्यक्षांवर कागदपत्रे फेकल्याचा आरोप होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पूर्व लडाखमधील चीनसोबतच्या २०२० च्या सीमा तणावाचा मुद्दा उपस्थित करण्याचा आग्रह धरल्यावर हा वाद अधिकच वाढला. त्यानंतर सभागृहात जोरदार चर्चा आणि गदारोळ झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे