
सोलापूर, 17 मार्च (हिं.स.)आखाती देशात उद्भवलेली युद्धाची स्थिती पाहता सर्वसामान्यांमध्ये गॅस तुटवड्याची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याला गॅस कमी पडेल की काय? या चिंतेने अनेक ग्राहकांनी बुकिंगचा सपाटा लावला आहे. मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत झाल्याने गॅस पुरवठा विस्कळित झाल्याचे दिसत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातून तब्बल ७० हजार सिलिंडरचे बुकिंग झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आज जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांची व्हीसीद्वारे आढावा बैठक घेतली. या शिवाय भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कार्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या प्रतिनिधींसोबत, जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्यासोबतही आढावा बैठक घेतली. सोलापूर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी गॅस सिलिंडरची साठेबाजी झाली आहे, त्या ठिकाणी पुरवठा विभागाने, तहसीलदारांनी धाड टाकून कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियोजन केले जात आहे. रोज जिल्ह्याला २० हजार गॅस सिलिंडरचा सुरळीत पुरवठा होत असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड