डोंबिवली नववर्ष स्वागत यात्रा ते गावची जत्रा; कलाकारांच्या गुढी पाडव्याचे खास प्लॅन
मुंबई, 18 मार्च (हिं.स.)। गुढी पाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा मराठी नववर्षाचा सण आहे. घराघरांत गुढी उभारून, पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत आणि शोभायात्रांमध्ये सहभागी होत आनंद साजरा केला जातो. यंदा झी मराठीतील कलाकारही खास पद्धत
डोंबिवली नववर्ष स्वागत यात्रा ते गावची जत्रा, कलाकारांच्या गुढी पाडव्याचे  खास प्लॅन


मुंबई, 18 मार्च (हिं.स.)। गुढी पाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा मराठी नववर्षाचा सण आहे. घराघरांत गुढी उभारून, पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत आणि शोभायात्रांमध्ये सहभागी होत आनंद साजरा केला जातो. यंदा झी मराठीतील कलाकारही खास पद्धतीने हा सण साजरा करणार आहेत.

*वल्लरी विराज (श्रावणी), शुभ श्रावणी :*

गुढी पाडव्याला डोंबिवलीच्या शोभायात्रेत ‘शुभ श्रावणी’च्या सहकलाकारांसोबत सहभागी होणार आहे. प्रेक्षकांना भेटण्याची ही एक संधी असते आणि नववर्ष त्यांच्यासोबत साजरे करण्याचा अनुभव खूप सुखद असतो. शोभायात्रे मधला लोकांचा उत्साह पाहण्यासारखा व अनुभवण्यासारखा असतो. मी ही छान पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत जाणार आहे. माझ्या घरीही तितक्याच उत्साहाने गुढी पाडवा साजरा केला जातो. आम्ही एकत्र गुढी उभारतो आणि आई मस्त बासुंदी पुरीच जेवण बनवते.

*विजया बाबर (कमळी), कमळी:*

यावर्षी मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी होणार आहे. आणि नंतर दरवर्षीप्रमाणे मी गावी जाणार आहे. गुढी पाडव्याच्या नंतर जो शनिवार येतो, त्या दिवशी आमच्या गावात ग्रामदेवता जानुबाईची जत्रा असते, त्यासाठी आम्ही सर्व जातो. यावर्षी एक खास गोष्ट म्हणजे, मागच्या वर्षी जत्रेसाठी गावी गेले असताना, ज्या दिवशी जत्रा होती त्याच दिवशी मला ‘कमळी’साठी कॉल आला होता. तेव्हा मी मनात इच्छा व्यक्त केली होती की हे काम मिळावे, आणि ते झाले म्हणून यावेळी आभार मानणार आहे. आमच्याकडे आजी गुढी उभारायची. मी सातारची असल्यामुळे घरी पुरणपोळी, गुळवणी आणि कटाची आमटी असतेच. मला ढोल-ताशा पथक खूप आवडते, शोभायात्रेबद्दल खूप उत्सुक आहे. सर्व प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

*मेघना एरंडे (पमा परब), सनई चौघडे:*

मी दरवर्षी घरीच गुढी पाडवा साजरा करत होते, पण यावर्षी मी झी मराठी आणि ‘सनई चौघडे’च्या कुटुंबासोबत हा सण साजरा करणार आहे. आम्ही सर्व एकत्र डोंबिवली शोभायात्रेत सहभागी होणार आहोत. आमची मालिका गुढी पाडव्याच्या आठवड्यात सुरू झाली आहे, त्यामुळे प्रेक्षकांसोबत हे नवीन वर्ष साजरे करण्याचा उत्साह दुप्पट आहे. या नववर्षाचा माझा संकल्प म्हणजे आमच्या नवीन मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि त्यांचे प्रेम मिळवणे. आमच्या घरी मी आणि माझ्या सासूबाई पहाटे उठून गुढी उभारतो. आमच्याकडे बायकांचेच राज्य असल्यामुळे गुढीसाठी कोणता शेंडा आणि कोणती साडी लावायची हे आम्ही ठरवतो. आमच्याकडे एक खास काठी आहे जी फक्त गुढी उभारण्यासाठीच वापरली जाते. आमच्या बाल्कनीत बरीच जागा आहे जिथे आम्ही गुढी उभारून पूजा करतो. त्या दिवशी सुग्रास जेवण असते. यावर्षी मी पहिल्यांदाच शोभायात्रेत सहभागी होणार आहे. त्यानंतर ‘सनई चौघडे’च्या टीमसोबत दुपारचे जेवण करणार आहे. माझ्यासाठी हे नववर्ष एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुख, समृद्धी, भरभराट, शांतता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम आरोग्य घेऊन येवो, ही सदिच्छा.

*जुई गोगरी (आसावरी), सनई चौघडे :*

सर्वांना माझ्याकडून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. यावर्षीपासून आम्ही घरी गुढी उभारणार आहोत. मी दरवर्षी गिरगावच्या शोभायात्रेत जाते आणि मला ती खूप आवडते, कारण तिथे आपली माणसं एकत्र आली आहेत असे वाटते. गुढी पाडवा म्हटलं की गोड जेवण असायलाच पाहिजे, गुळपोळी, श्रीखंड-पूरी, बटाट्याची भाजी, वरण-भात, भाजी, कोशिंबीर, पापड, लोणचं असा एक छान बेत असतो. दरवर्षी मी देवळात जाऊन बाप्पाचा आशीर्वादही घेते.

जसे हे कलाकार आपल्या खासगी आयुष्यात गुढी पाडवा साजरा करतात, तसेच झी मराठीवरील *लक्ष्मी निवास* , *कमळी* , *वीण दोघातली ही तुटेना* , *शुभ श्रावणी* आणि तुला जपणार आहे मालिकांमध्ये सुद्धा गुडीपाडव्याचा उत्साह बघायला मिळणार आहे. *‘तुला जपणार आहे’* मालिकेत मीरा आणि अथर्व आपल्या संपूर्ण परिवारासोबत गुढी उभारणार आहेत. ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेत समर–स्वानंदी आणि रोहन–अधिराचा आणि लक्ष्मी निवास मालिकेत सिद्धू आणि भावनाचा हा पहिला गुढी पाडवा असून तोही खास असणार आहे.

*तेव्हा बघायला विसरू नका तुमची लाडकी झी मराठी.*

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande