रत्नागिरी : खल्वायन गुढीपाडवा विशेष संगीत सभेत माणिक वर्मांची गीते
रत्नागिरी, 18 मार्च, (हिं.स) येथील खल्वायन संस्थेची वार्षिक गुढीपाडवा विशेष संगीत सभा येत्या गुरुवारी, दि. १९ मार्च रोजी होणार असून अष्टपैलू माणिकताई वर्मा यांनी गायिलेली गीते यावेळी सादर होणार आहेत. माणिकताई वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त
माणिक वर्मा


अर्चना कान्हेरे


अपूर्वा रानडे


वैदेही मेकडे


रत्नागिरी, 18 मार्च, (हिं.स) येथील खल्वायन संस्थेची वार्षिक गुढीपाडवा विशेष संगीत सभा येत्या गुरुवारी, दि. १९ मार्च रोजी होणार असून अष्टपैलू माणिकताई वर्मा यांनी गायिलेली गीते यावेळी सादर होणार आहेत.

माणिकताई वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने माणिकताईंच्या ज्येष्ठ शिष्या आणि प्रसिद्ध गायिका विदुषी अर्चनाताई कान्हेरे आणि त्यांच्या शिष्या अपूर्वा रानडे आणि वैदेही मेकडे या कार्यक्रमात माणिकताईंनी गाऊन अजरामर केलेले विविध गानप्रकार सादर करणार आहेत.

अर्चनाताई कान्हेरे यांना लहानपणापासून गायनाचे शिक्षण त्यांचे वडील प्रसिद्ध कीर्तनकार व तबला वादक कै. वासुदेव उपाध्ये यांच्याकडून मिळाले. एसएनडीटी विद्यापीठातून बीए, एमए ( संगीत) पदव्या त्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांकाने प्राप्त केल्यानंतर माणिकताई वर्मा यांच्या त्या पट्टशिष्या बनल्या. पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांकडूनही त्यांना मार्गदर्शन मिळाले. मराठी नाट्य परिषदेचा माणिक वर्मा आणि बालगंधर्व रसिक मंडळाचा काकासाहेब खाडिलकर पुरस्कार त्यांना मिळाला. दूरदर्शन, आकाशवाणीच्या त्या प्रथम श्रेणी मान्यताप्राप्त कलाकार आहेत. देश-परदेशात अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले असून गायनाच्या मैफलीही अनेक प्रतिष्ठित समारोहात त्यांनी सादर केल्या आहेत.

अपूर्वा रानडे यांनी बीए व एमए (संगीत) या पदव्या विशेष श्रेणीत प्राप्त केल्या आहेत. गेली १५ वर्षे त्या भेंडी बाजार घराण्याच्या प्रसिद्ध गायिका श्रीमती शुभा जोशी यांच्याकडून शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम गीत तसेच गझल गायनाचे शिक्षण घेत आहेत. अर्चनाताईंकडेही त्यांचे शिक्षण चालू आहे. मिलिंद इंगळे व दीपक पाटेकर यांच्याकडून त्या सुगम संगीताचे शिक्षण घेत आहेत. ठिकठिकाणच्या गायन स्पर्धेत पारितोषिके तसेच संगीत महोत्सवातून त्यांनी आपली कला सादर केली आहे.

वैदेही मेकडे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून वयाच्या दहाव्या वर्षापासून त्या अर्चनाताईंकडून गायनाचे शिक्षण घेत आहेत. ठुमरी आणि गझल गायकीचे शिक्षण त्या रमाकांत गायकवाड यांच्याकडून घेत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांनी २ वर्षे अनेक पदके मिळविल्यामुळे त्यांना सुवर्णकन्या म्हणून ओळखले जायचे. नाट्यसंगीताकरीता त्यांना आकाशवाणीकडून सुवर्णपदक प्राप्त असून झी मराठीच्या सारेगमप तसेच इंडियन आयडॉल (ज्युनिअर) यामध्येही त्यांनी आपले गानकौशल्य सिद्ध केले आहे.

रत्नागिरीतील मैफलीला तबलासाथ हेरंब जोगळेकर, हार्मोनियम साथ श्रीरंग जोगळेकर, ऑर्गनसाथ अमित ओक करणार असून सूत्र संचालन दीप्ती कानविंदे करणार आहेत.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजता गुरुकृपा मंगल कार्यालयात ही मैफल होणार आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने प्रायोजित केलेली ही मैफल सर्व रसिकांना विनाशुल्क असून मैफलीचा आस्वाद घेण्याचे आवाहन खल्वायन संस्थेने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande